Agriculture News: जमिनीचा ताबा तुमच्याकडे आहे, पण कागदपत्र नाहीत? अशी सिद्ध करा कायदेशीर मालकी!

Agriculture News: भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी जमिनीचे विषय हे अधिकच गुंतागुंतीचे असतात. काहीवेळेस तर स्वतःची जमीन असून सुद्धा त्यावरची मालकी सिद्ध करता येत नाही. गावात अनेकांकडे त्यांची जमीन असते, पीढ्यानपिढ्या ती कसली जाते, पण काळाच्या ओघात कधी कुणी कागदपत्र पाहिलेलेच नसतात. आणि मग अचानक काही कामांसाठी सगळ्या कागदपत्रांची गरज भासते. आणि तेव्हा प्रश्न पडतो की आपली जमीन ही कायद्याने खरच आपल्या नावावर आहे का?

हीच परिस्थिती अनेक शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागातल्या कुटुंबांच्या वाट्याला आली आहे. तुमचा जमिनीवर प्रत्यक्ष ताबा आहे, पीक घेतलं जातंय, विहीर बांधली गेलीय, झाडं लावली आहेत, पण जर कागदावर तुमचं नावच नसेल, तर हा सगळा ताबा कायदेशीर कसा सिद्ध होईल? पण आता काळजी करू नका. तुमच्यासारख्या असंख्य लोकांसाठी भारतीय कायद्यात काही विशिष्ट पर्याय आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमचा मालकी हक्क सहज सिद्ध करू शकणार आहात.

मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक गोष्टी

1) जुनी कागदपत्रे तपासा

कधी कधी वारसा हक्कानं जमिनीचा ताबा मिळतो, पण त्याची नोंदणी केली जात नाही. त्यामुळे आधी तर तुम्ही तुमच्या घरात या संबंधित असणारी सगळी जुनी कागदपत्रं तपासणं गरजेचं आहे जसं की,

  • विक्री करार (Sale Deed)
  • भेटपत्र (Gift Deed)
  • विभाजन करार (Partition Deed)

2) शेजाऱ्यांची कागदपत्रे तपासा

शेजाऱ्यांच्या सातबाऱ्यामध्ये, मोजणीच्या कागदांमध्ये तुमच्या शेताचा उल्लेख असल्यास तो सुद्धा तुमच्यासाठी एक प्रभावी आधार ठरू शकतो.

3) तसेच जमिनीवर तुमचा हक्क सिद्ध करणारे पुरावे गोळा करा जसे की,

  • वीज आणि पाणी बील
  • मालमत्ता कराच्या पावत्या
  • ग्रामपंचायतीचं कोणतंही प्रमाणपत्र
  • शेजाऱ्यांची साक्ष (साक्षीदार म्हणून)

हे पुरावे तुम्ही दीर्घकाळ त्या जमिनीवर राहत असल्याचं आणि त्या जमिनीचा ताबा तुमच्याकडे असल्याचं सिद्ध करण्यास मदत करत.

कायदेशीर मार्गदर्शन आणि प्रक्रिया

1) अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या

अनुभवी वकिलाचा सल्ला घेतल्यास, तुमची केस समजून घेतल्यावर वकील तुम्हाला योग्य कायदेशीर सल्ला देईल. तसेच हक्क सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रं हवीत, कोणत्या कायद्यानुसार कार्यवाही करता येईल हे तो स्पष्ट करेल.

2) दिवाणी खटला दाखल करा

जर तुमच्याकडे ताबा आणि इतर आवश्यक पुरावे असतील, तर जमिनीच्या हक्कासाठी दिवाणी खटला दाखल करता येतो. हा खटला दाखल केल्यानंतर न्यायालय पुराव्यांच्या आधारे निर्णय देते.

3) प्रतिकूल ताबा कायदा

जर तुम्ही कोणत्याही जमिनीवर सातत्याने 12 वर्षे तुमचा ताबा राखला असेल, आणि या काळात मूळ मालकाने कुठल्याही प्रकारचा दावा केलेला नसेल, तर ‘Adverse Possession’ या कायद्याअंतर्गत ती जमीन तुम्ही तुमच्या नावावर करून घेऊ शकता.

स्थानिक प्रशासनाची मदत

यामधे तुम्हाला ग्रामपंचायत (ग्रामीण भागात) किंवा महानगरपालिका/नगर परिषद (शहरी भागात) यांच्याकडून जमिनीच्या ताब्याचं प्रमाणपत्र मिळवता येतं. हे प्रमाणपत्र जमिनीवर तुमचाच ताबा असल्याचं अधिकृतरीत्या दाखवतं, जे की नोंदणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

भविष्यात वाद टाळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी

  • यासाठी सगळ्यात आधी जमिनीची नोंदणी पूर्ण करा, ताबा असला तरी जमिनीसाठी कागदांनीही आधार मिळणं गरजेचं आहे.
  • सर्व कागदपत्रं डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवा, जसं की स्कॅन करून ईमेल किंवा पेनड्राइव्हमध्ये सुरक्षित ठेवा.
  • जमिनीवर नियमित नजर ठेवा, कोणी अतिक्रमण करतंय का, हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
  • कोणताही वाद, तंटा उद्भवल्यास ताबडतोब कायदेशीर सल्ला घ्या.

शेवटी एक लक्षात घ्या की आपली जमीन ही आपली ओळख असते. त्यामुळे जर तुमच्याकडे प्रत्यक्ष जमीन आहे, पण त्या बाबतीत कोणतीही कागदपत्रं नाहीत, तर योग्य त्या प्रकारे सगळी कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करा.