How to Become a Pilot: पायलट होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? किती वर्ष लागतात? खर्च किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर!

How to Become a Pilot: लहानपणी आकाशात उडणारे विमान पाहून आपल्यापैकी कित्येक जणांनी एकदा तरी “आपणही पायलट व्हावं!” असं स्वप्न पाहिलच असेल. कॉकपिटमध्ये बसून विमान चालवायचं, हजारो फूट उंचावर आकाशात विहार करायचा, हा अनुभव केवळ काही निवडक लोकांनाच मिळतो. पण तुम्हालाही पायलट व्हायचंय का? तुमचही पायलट होण्याचं स्वप्न आहे का? तर मग आजच त्यासाठीची योग्य माहिती घेऊन तुमच्या स्वप्नाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू करा!

पायलट होण्यासाठी कोणत्या अटी आहेत? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम विचारात घ्यावा लागतो? किती खर्च येतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास कसा सुरू करायचा? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पायलट होण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा?

पायलट होण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचा पायलट व्हायचंय, हे आधी ठरवणे आवश्यक आहे.

  • कमर्शियल पायलट (CPL): हे प्रवासी आणि मालवाहू विमान चालवणारे व्यावसायिक पायलट असतात. CPL मिळवण्यासाठी १८-२४ महिने लागतात.
  • खाजगी पायलट (PPL): खाजगी विमान चालवण्यासाठी हा परवाना आवश्यक असतो. मात्र, यात व्यावसायिक विमान उडवण्याचा परवाना मिळत नाही.
  • एअरलाइन कॅडेट प्रोग्राम: काही विमान कंपन्या थेट पायलट ट्रेनिंगसाठी कॅडेट प्रोग्राम घेतात. यामध्ये निवड झाल्यास तुम्हाला नोकरीसह प्रशिक्षणाची संधी मिळते.

भारतातील DGCA (Directorate General of Civil Aviation) मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूलमधून कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळवणे आवश्यक आहे.

पायलट होण्यासाठी पात्रता काय असावी? | Eligibility to become a pilot

कमर्शियल पायलट होण्यासाठी किमान १७ वर्षे, तर खाजगी पायलटसाठी १६ वर्षे वय असावे.

भौतिकशास्त्र आणि गणितासह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण जर कोणी विज्ञान शाखेचे विद्यार्थी नसले तरीही ते स्वतंत्र परीक्षा देऊन हि पात्रता मिळवू शकतात.

मेडिकल फिटनेस सुद्धा यासाठी आवश्यक आहे. या अंतर्गत तुम्हाला DGCA क्लास १ मेडिकल टेस्ट उत्तीर्ण करावी लागते. ही चाचणी शारीरिक व मानसिक फिटनेस तपासण्यासाठी घेतली जाते.

तसेच तुम्हाला इंग्रजी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे, कारण सर्व अभ्यासक्रम आणि संवाद इंग्रजीतच असतो.

योग्य फ्लाइंग स्कूल कसं निवडावं?

भारतात ३० हून अधिक DGCA मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूल आहेत, पण योग्य स्कूल निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ज्या फ्लाइंग स्कूलमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात, ती अधिकृत मान्यताप्राप्त आहे की नाही, हे आधी तपासा.

त्यांनतर स्कूलमध्ये योग्य प्रकारचे सिम्युलेटर आणि प्रशिक्षण विमान उपलब्ध आहेत का, हे पाहा.

यासोबतच ज्या ठिकाणी सतत पाऊस किंवा ढगाळ हवामान असते, तेथे उड्डाण प्रशिक्षण घेणे कठीण होते. त्यामुळे हवामान चांगले असलेल्या ठिकाणचा विचार करा.

पायलट ट्रेनिंगसाठी साधारण ₹३५ ते ₹५० लाख खर्च येतो. काही विद्यार्थी यासाठी शैक्षणिक कर्ज किंवा स्पॉन्सरशिप घेऊन शिक्षण पूर्ण करतात.

काही फ्लाइंग स्कूल जॉब प्लेसमेंटमध्ये मदत करतात, त्यामुळे अशा स्कूलची निवड करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊन पुढे काय?

  • यापुढे तुम्हाला प्रवेश अर्ज भरून आवश्यकतेनुसार प्रवेश परीक्षा द्यावी लागेल.
  • त्यांनतर DGCA क्लास १ मेडिकल टेस्ट पास करणे गरजेचे आहे.
  • सोबतच ग्राउंड स्कूल ट्रेनिंग, ज्यामध्ये नेव्हिगेशन, हवामानशास्त्र, विमान सुरक्षा नियम आणि उड्डाण तंत्रज्ञान शिकवलं जातं, हे पूर्ण करणे हि बंधनकारक आहे.
  • त्यांनतर फ्लाइट ट्रेनिंग सुरू करा. कमर्शियल पायलट होण्यासाठी २०० तासांचे उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी १८-२४ महिने लागतात.

पायलट परवाना मिळवण्यासाठी काय करावं?

  • पायलट लायसन्स मिळवण्यासाठी काही महत्वाच्या परीक्षा द्याव्या लागतात.
  • यासाठी सर्वप्रथम DGCA थीअरी परीक्षा उत्तीर्ण करा.
  • नंतर RTR (Radio Telephony Restricted) परीक्षा पास करा.
  • २०० हून अधिक फ्लाइट तास पूर्ण करा.
  • DGCA स्किल टेस्ट उत्तीर्ण करा.

पायलट होण्यासाठी किती खर्च येतो? आर्थिक मदतीचे पर्याय कोणते? | Cost to become a pilot

पायलट ट्रेनिंगचा खर्च साधारण ₹३५-५० लाख असतो. अनेक बँका आणि वित्तीय संस्था पायलट प्रशिक्षणासाठी कर्ज देतात. सोबतच काही विमान कंपन्या निवडक विद्यार्थ्यांना स्पॉन्सर सुद्धा करतात. काही राज्य सरकारे आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती किंवा अनुदान देखील उपलब्ध करून देतात.

पायलट झाल्यानंतर करिअर संधी काय आहेत? | Career opportunities after becoming a pilot

पायलट होण्याचा प्रवास पूर्ण केल्यानंतर तुम्हाला विविध क्षेत्रांत संधी मिळू शकतात.

  • कमर्शियल एअरलाइन पायलट: इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेटसारख्या मोठ्या विमान कंपन्यांमध्ये या अंतर्गत नोकरी मिळवता येते.
  • कॉर्पोरेट जेट पायलट: मोठ्या कंपन्यांच्या खासगी जेटसाठी पायलट बनता येते.
  • एअर फोर्स किंवा सरकारी पायलट: भारतीय हवाई दल आणि सरकारी क्षेत्रातही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
  • फ्लाइट ट्रेनर: नवीन पायलटना प्रशिक्षण देण्याची संधी मिळू शकते.

पायलट होणं हे सोपं नसलं तरीही अशक्यही नाही. प्रसंगी मेहनत, चिकाटी आणि योग्य दिशा मिळाल्यास तुमचं स्वप्न साकार होऊ शकतं!