Jamin Mojani:  जमीन मोजणी कशी करतात?, ही प्रक्रिया किती दिवसांत पूर्ण होते? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Jamin Mojani: जमीन मोजणी (Land Measurement) म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि भावनिक घटक असल्याचं बघायला मिळतं. प्रत्येक इंचाच्या जमिनीचा मोल ठरलेला असतो, म्हणूनच जमिनीची मोजणी अचूक पद्धतीने केली जाणे अत्यंत आवश्यक आहे. साधारणपणे, ही मोजणी (Jamin Mojani) सरकारी संस्थांमार्फत केली जाते, परंतु कधी कधी खासगी व्यक्तींकडून देखील ही मोजणी केली जाते. अनेक वेळा शेतकरी यासाठी फार वेळ लागत असल्याची तक्रार करत असतात. चला तर मग आजच्या या लेखात जमीन मोजणी कशी केली जाते आणि याचे कोणते विविध प्रकार आहेत ते समजून घेऊया.

जमीन मोजणीसाठी अर्ज कोठे करावा? | Land Measurement Application

जर तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजणी करून घ्यायची असेल, तर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला या अर्जासोबत काही महत्वाची कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक असणार आहे. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी याबद्दलची माहिती आम्ही पुढे दिलीच आहे.

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे:

  • चालू ७/१२ उतारा – हा तलाठ्याकडून उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.
  • कच्चा बिनस्केली नकाशा – ज्यामध्ये मोजणी करावयाच्या जमिनीचे स्पष्ट चित्र असायला हवे.
  • रहिवासी पुरावा व आधार कार्ड – ७/१२ उतारावरील धारकांचे पत्त्याचे पुरावे.
  • मोजणी फी चलन – भरलेले मूळ चलन व झेरॉक्स.

मोजणी प्रक्रिया कशी केली जाते? | Land Measurement Process

अर्जाच्या प्राप्तीनंतर भूमिअभिलेख कार्यालयात त्या अर्जाची नोंद घेतली जाते. यानंतर, अर्ज क्रमांक देऊन अर्ज सर्वेअरकडे दिला जातो. सर्वेअर अर्ज केलेल्या व्यक्तीस मोजणीच्या कमीत कमी १५ दिवस आधी नोटीस पाठवतो. जर जमीन खालीवर असेल किंवा त्या ठिकाणी ओढे किंवा नाले असतील तर अश्या जमिनीची मोजणी ही प्लेन टेबल पद्धतीने केली जाते ज्यामुळे जमिनीचे अचूक माप घेण्यास मदत होते.

जर शेजारील शेतकरी मोजणीच्या वेळी उपस्थित नसला तरी त्याच्या गैरहजेरीत देखील त्याच्या जमिनीची मोजणी केली जाऊ शकते, परंतु त्या शेतकऱ्याला आधी जमीन मोजणीची नोटीस देणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनीही मोजणीच्या वेळी उपस्थित राहणे आणि मोजणीसाठी सहाय्य करणे महत्त्वाचे आहे.

मोजणीचे प्रकार | Types of Land Measurement

जमिनीच्या मोजणीचे प्रकार आणि त्यातील वेगवेगळे वेळापत्रक असे आहेत:

  • साधी मोजणी – साधारणतः १८० दिवसांत पूर्ण होते.
  • तातडीची मोजणी – साधारणतः १२० दिवसांत पूर्ण होते.
  • अति तातडीची मोजणी – साधारणतः ६० दिवसांत पूर्ण होते.
  • अतिअति तातडीची मोजणी – साधारणतः १० दिवसांत पूर्ण होते.

अर्ज केलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या प्रतिनिधीने मोजणीच्या वेळी उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे. शेजारील शेतकऱ्याने देखील मोजणीसाठी उपस्थित राहून मोजणीसाठी लागणाऱ्या सगळ्या आवश्यक वस्तु व साधनसामग्री जमवण्यासाठी सहाय्य करणे गरजेचे आहे.

प्रमुख मोजणी प्रकार | Types of Measurement for Land

  • हद्द कायम मोजणी
  • पोटहिस्सा मोजणी
  • भूसंपादन संयुक्त मोजणी
  • कोर्टवाटप मोजणी
  • कोर्टकमिशन मोजणी
  • बिनशेती मोजणी
  • निमताना मोजणी
  • सुपर निमताना मोजणी
  • ई-मोजणी

हे काही जमीन मोजणीचे मुख्य प्रकार आहेत.

निमताना व सुपर निमताना मोजणी म्हणजे काय? | Appeal Measurement Types

जर जमीन मोजणीच्या प्रक्रियेत दिलेल्या हद्दीच्या खुणा अर्जदाराला मान्य नसतील, तर तालुका निरीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात त्याबद्दलची अपील दाखल करता येते. त्यास निमताना मोजणी म्हणतात. जर निमताना मोजणी देखील मान्य नसेल, तर जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांच्याकडे सुपर निमताना मोजणीसाठी अपील करता येते.

जमिनीच्या मोजणीसंबंधित प्रक्रियेत सर्व नियमांची आणि पद्धतींची जाणीव असणे अत्यावश्यक आहे. यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, मोजणी प्रक्रियेत सहभागी होणे, आणि जर आवश्यक असेल, तर अपील प्रक्रियेत देखील सहभागी होणे महत्त्वाचे आहे.