MHADA Lottery 2025: छोटंसं असलं तरीही चालेल, पण ते आपलं असं घर असावं, ही भावना जवळजवळ आपल्या प्रत्येकाच्याच मनात खोलवर रुजलेली असते. पण मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात घर घेणं ही आज केवळ इच्छा न राहता एक मोठं आव्हान झालं आहे. घरांची वाढतच असलेली किंमत, मर्यादित उत्पन्न आणि आर्थिक अस्थिरता यामुळे अनेकांच घर घेण्याचं हे स्वप्नं अधुरच राहतं. पण आता मात्र हे स्वप्न पुर्णत्वास जाऊ शकण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण म्हाडाने 2025 वर्षासाठी कोकण गृहनिर्माण मंडळाच्या माध्यमातून तब्बल 5000 पेक्षा अधिक घरं आणि प्लॉट्ससाठी लॉटरी जाहीर केली आहे.
घरे आणि प्लॉट्स कुठे मिळणार आहेत?
या लॉटरीत ठाणे शहर, ठाणे जिल्हा, वसई (पालघर जिल्हा), ओरोस (सिंधुदुर्ग जिल्हा), आणि बदलापूर (कुलगाव) अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरं आणि प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. म्हाडाच्या विविध योजनांअंतर्गत ही घरं विभागली गेली आहेत. त्यामध्ये, 20 टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेतून 565 घरं, एकत्रित शहर विकास योजनेतून 3002 घरं, कोकण मंडळ योजना अंतर्गत 1677 घरं, तर विक्रीसाठी, 50 टक्के परवडणाऱ्या दरात आणखी 41 घरं उपलब्ध केली गेली आहेत. त्यासोबतच, ओरोस आणि बदलापूर या ठिकाणी एकूण 77 प्लॉट्सदेखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
अर्ज कधी व कसा करायचा?
घर घेण्यासाठीची ही सुवर्णसंधी 14 जुलै 2025 पासून उपलब्ध होणार असून, याच दिवशी दुपारी 1 वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जायसवाल यांच्या हस्ते या लॉटरीचा अधिकृत शुभारंभ झालेला आहे. तसेच सर्व इच्छुक अर्जदार https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 13 ऑगस्ट 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत या लॉटरी साठी अर्ज करू शकणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर फी भरण्याची अंतिम तारीख ही 14 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे.
ड्राफ्ट आणि अंतिम यादी कधी जाहीर होणार?
लॉटरीसाठी आलेल्या अर्जांची ड्राफ्ट यादी ही 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर 25 ऑगस्ट पर्यंत अर्जदारांना आपले दावे किंवा हरकती ऑनलाइन नोंदवता येणार आहेत. या प्रक्रियेनंतर अंतिम पात्र अर्जांची यादी 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाईल.
लॉटरी ड्रॉ कधी आणि कुठे होणार?
सर्व पात्र अर्जदारांसाठी संगणकीकृत लॉटरी ड्रॉ हा 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे याठिकाणी जाहीर करण्यात येणार असून, ही प्रक्रिया पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा?
लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदार त्यांच्या Android किंवा iOS मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिममध्ये IHLMS 2.0 हे लॉटरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्यावरून अर्ज भरू शकतात. या सॉफ्टवेअरद्वारे अर्जाची नोंदणी, कागदपत्र अपलोड करणे आणि शुल्क भरणे या सगळ्या गोष्टी मोबाईलवरच करता येतील. याशिवाय, म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवरूनही ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
तर मित्रांनो, घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, ते असतं सुरक्षिततेचं, आधाराचं आणि समाधानाचं प्रतीक. म्हाडा कोकण मंडळाच्या 2025 च्या या लॉटरीतून हजारो कुटुंबांना त्यांचं कित्येक वर्षाचं स्वतःच्या घराचं असलेलं स्वप्नं सत्यात उतरवण्याची संधी मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला वेळेवर अर्ज करणं आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात गमावू नका, वेळेवर अर्ज करा आणि तुमचं घराचं स्वप्न आजच प्रत्यक्षात उतरवा.