Satbara Utara: आजच्या काळात जमीन म्हणजे केवळ मालमत्ता नाही, तर ती एक अमूल्य गुंतवणूक ठरत आहे, आणि त्यामागे असतात ती अनेक स्वप्नं. पण कधी कधी हे स्वप्न एका चुकीच्या कागदाच्या तुकड्यामुळे उद्ध्वस्त देखील होऊ शकतं. होय, आज आपण बोलतोय बोगस सातबारा उताऱ्याबद्दल. सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसाच आहे. पण जर तो आरसाच खोटा असेल, तर? बऱ्याच वेळा लोक नकली किंवा बदललेले सातबारा वापरून जमीन विकतात, कर्ज घेतात आणि शेवटी त्यांच्या अशा वागण्याने खरेदीदाराचे मोठं नुकसान सुद्धा करतात. त्यामुळे जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल, तर पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या की, समोर ठेवलेला सातबारा खरा आहे की बोगस आहे?
सातबारा उतारा का असतो इतका महत्त्वाचा?
सातबारा म्हणजे एका जमिनीच्या मालकीपासून ते पीक पद्धतीपर्यंतची सर्व माहिती सांगणारा एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज. यामध्ये मालकाचे नाव, शेतीचा प्रकार, तसेच हक्क आणि वारसदार या सगळ्यांबद्दल अगदी व्यवस्थित नोंद करण्यात आलेली असते. पूर्वी हे सगळं हाताने लिहिलेलं असायचं, नंतर संगणकावरून प्रिंट स्वरूपात देण्यात येऊ लागलं, आणि आता तर “डिजिटल सातबारा” चा जमाना आला आहे. ही सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली असली, तरी याच डिजिटल फॉर्मेटचा गैरफायदा घेत अनेक फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढले असल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच खरेदी करताना, कुणीही तुमच्यासमोर सातबारा ठेवला तर लगेच “हो” म्हणण्याआधी, खालील तीन महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत बारकाईने तपासल्याच पाहिजेत.
1. तलाठ्याची सही आणि डिजिटल टीप
सर्वात आधी बघा की, सातबाऱ्यावर तलाठ्याची सही आहे का? पारंपरिक सातबाऱ्यावर तलाठ्याची सही असते. पण जर तो डिजिटल सातबारा असेल, तर त्यावर स्पष्टपणे एक टीप लिहिलेली असते आणि ती म्हणजे अशी की, “हा गाव नमुना ७ आणि १२ डिजिटल स्वरूपात असल्यामुळे सही किंवा शिक्क्याची गरज नाही.” जर ही टीप नसेल, आणि सातबारा फक्त प्रिंट स्वरूपात दिला असेल, तर त्या कागदाची व्यवस्थित पडताळणी करणं गरजेचं आहे. कारण खोट्या कागदपत्रांमध्ये अशी टीप दिलेली नसतेच.
2. QR कोड तपासा, हिच खऱ्या माहितीची गुरुकिल्ली आहे
डिजिटल सातबाऱ्यावर QR कोड असतो, आणि तोच खऱ्या माहितीचा पुरावा आहे. हा कोड स्कॅन केला की थेट महाभूमी पोर्टलवर जाऊन त्या जमिनीची माहिती मिळते. जर हा QR कोड नसेल, किंवा स्कॅन करताना चुकीची लिंक उघडत असेल, तर समजून घ्या, काहीतरी गडबड आहे. बोगस सातबाऱ्यांची ही सर्वात मोठी ओळख असते.
3. LGD कोड आणि महाभूमीचा लोगो
जर डिजिटल सातबारा ओरिजनल असेल, तर त्यावर LGD कोड (Local Government Directory) देण्यात आलेला असतो, जो त्या विशिष्ट गावाची विशिष्ट ओळख दर्शवतो. याशिवाय, दोन अत्यंत महत्त्वाचे लोगो हे त्या सातबारा वर पाहिजेच पाहिजेत, पहिला म्हणजे वरच्या बाजूस महाराष्ट्र शासनाचा लोगो, आणि दुसरं म्हणजे मधोमध ई-महाभूमी पोर्टलचा लोगो, हे दोन्ही नसतील, तर इतर कुठलाही विचार न करता, सरळ तो कागद बाजूला करा आणि अधिकृत पोर्टलवरून स्वतः सातबारा डाउनलोड करून घ्या.
माहिती असेल तरच सुरक्षित गुंतवणूक होईल
घर, जमीन किंवा शेती घेणं हा काही केवळ व्यवहार नाही, ती एक जबाबदारी आहे, एक स्वप्न आहे. आणि ते स्वप्न कुठल्याही खोट्या कागदांमुळे खराब होऊन नये म्हणून अशी माहिती प्रत्येकाने जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आज ज्याप्रकारे तुम्ही ही माहिती वाचत आहात, तसंच उद्या तुम्ही देखील कदाचित कोणाला तरी फसवणुक होण्यापासून वाचवू शकता. म्हणूनच, जमीन घेताना नेहमी खात्री करा की तो सातबारा खरा आहे की नाही?
कृपया ही माहिती तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाइकांमध्ये जरूर शेअर करा. कारण प्रत्येकजण ज्या दिवशी “बोगस सातबारा” ओळखू शकेल, त्या दिवशीच अशा फसवणुकींना पूर्णविराम लागेल.