Home Buying Care Tips: घर खरेदी करणं हे अनेकांसाठी आयुष्यातील मोठा टप्पा असतो. आपल्या हक्काच्या घरासाठी लोक वर्षानुवर्षे मेहनत करतात, पैसे साठवतात आणि अखेर घर घेण्याचा निर्णय घेतात. पण, दुर्दैवाने काही बिल्डर्स आणि डेव्हलपर्स त्यांच्या या भावनेचा गैरफायदा घेतात. आकर्षक जाहिराती, मोठी आश्वासनं आणि कमी वेळेसाठी देण्यात येणाऱ्या विशेष ऑफर्स यामुळे ग्राहक पटकन निर्णय घेतात आणि नंतर फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात.
“फ्लॅटची किंमत कधीच कमी होत नाही”, “आता विकत घ्या आणि काही महिन्यांत किंमत दुप्पट होईल” किंवा “आमच्या पहिल्या टॉवरचे सर्व फ्लॅट्स विकले गेलेत, आता पुढच्या टॉवरसाठी किंमत वाढणार आहे”, अशी वाक्यं तुम्ही जाहिरातींमध्ये किंवा सेल्स एक्झिक्युटिव्हकडून हमखास ऐकली असतील. असे वाक्यं ऐकून तुम्हाला असं खरंच वाटू लागेल की हा एक उत्तम गुंतवणुकीचा निर्णय आहे. पण, हे सत्य असतंच असं नाही. किंबहुना, अनेक वेळा अशा अफवांच्या जोरावर लोकांना महागड्या कर्जाच्या जाळ्यात अडकवलं जातं. हे बोलून लोकांच्या भावनांवर परिणाम केला जातो आणि गुंतवणुकीसाठी तयार केलं जातं. मात्र, अशा अफवांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.
EMI योजनांचा सापळा
घर घेताना EMI योजना सोप्या आणि परवडणाऱ्या वाटतात. काही बिल्डर्स सुरुवातीला EMI माफ असल्याचं सांगतात किंवा पहिल्या काही वर्षांसाठी कमी EMI देतात. हे ऐकून ग्राहक गुंतवणुकीचा निर्णय घेतात. पण नंतर हळूहळू EMI वाढत जातो आणि मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली ग्राहक दबला जातो. त्यामुळे EMI योजनांबाबत नीट माहिती घेऊनच पुढे जाणं महत्त्वाचं आहे.
REITs, खरोखरच सुरक्षित गुंतवणूक की आणखी एक धोका?
याशिवाय, आजकाल REITs (Real Estate Investment Trusts) हा एक नवा ट्रेंड आला आहे. लोकांना मोठ्या नफ्याच्या नावाने या योजनांमध्ये गुंतवणूक करायला सांगितलं जातं. अमेरिका आणि युरोपमध्ये हा प्रकार यशस्वी झाला असला, तरी भारतातील परिस्थिती वेगळी आहे. अनेक लोक याला सुरक्षित समजतात, पण प्रत्यक्षात त्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते.
बरेच लोक आजकाल REITs (Real Estate Investment Trusts) मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. मोठ्या नफ्याच्या नावाने लोकांना यात गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केलं जातं. परदेशात REITs यशस्वी ठरल्या असल्या, तरी भारतातील रिअल इस्टेट बाजाराचे अजूनही व्यवस्थित रित्या नियमन झालेले नाही. त्यामुळे या क्षेत्रात गैरव्यवहार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे REITs मध्ये गुंतवणूक करण्याआधी संपूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे.
घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाल?
घर घेताना फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे:
- बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड: आधीचे प्रकल्प वेळेवर पूर्ण झाले आहेत का, ग्राहकांचे अनुभव कसे आहेत, हे जाणून घ्या.
- RERA नोंदणी: तुमचा प्रकल्प RERA मध्ये नोंदणीकृत आहे का, याची खात्री करा.
- कागदपत्रांची पडताळणी: कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रं नीट वाचा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याची पडताळणी करून घ्या.
- बांधकामाची प्रगती: घर कोणत्या टप्प्यावर आहे आणि पूर्ण होण्याची तारीख नक्की काय आहे, हे जाणून घ्या.
- EMI योजना आणि कर्जाचे फायदे-तोटे: कर्जाच्या अटी आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम समजून घ्या.
भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, योग्य गुंतवणूक करा!
घर घेताना घाई करू नका. बाजाराची परिस्थिती समजून घ्या, तुलना करा आणि मगच योग्य निर्णय घ्या. भावनिक निर्णय टाळा आणि आपल्या मेहनतीच्या पैशाची योग्य गुंतवणूक करा. बिल्डर्सच्या मोहक जाहिरातींना भुलू नका, सावध राहा आणि तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करा. कारण तुमचं घर खरोखरच तुमचं ‘स्वप्नातील घर’ बनावं, हेच महत्त्वाचं आहे!