Jamin Kharedi Fasavnuk: माणसाचं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न म्हणजे स्वतःची एक छोटीशी जमीन असावी, त्यावर आपलं घर उभं राहावं. पण दुर्दैव असं की, जमीन खरेदीच्या व्यवहारात सध्या फसवणूक करणारे लोक वाढले आहेत. काहीजण तर अशा प्रकारे फसवतात की सामान्य माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळेच जमीन खरेदी करताना सावध राहणं गरजेचं आहे. आज आपल्यासमोर अशा फसवणुकीच्या घटना उघड होत आहेत ज्या ऐकूनही अंगावर शहारा येतो. काही लोक कर्जबाजारी होतात, तर काहीजण वर्षानुवर्षं कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात. त्यामुळे जमीन खरेदी करताना नेमकी फसवणूक कशी केली जाते, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण या लेखात या फसवणुकीबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत, ही माहिती व्यवस्थितरीत्या समजून घेण्यासाठी कृपया हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बनावट कागदपत्रं आणि खोट्या व्यक्ती
आजकाल बहुतांश जमीन व्यवहार ऑनलाईन माध्यमातून केले जातात. सातबारा, फेरफार अशी कागदपत्रं ऑनलाईन मिळतात, पण याचा गैरफायदा घेणारे लोक बनावट कागदपत्रं तयार करून सादर करतात. काही वेळा तर खुद्द जमीन विकणारा किंवा खरेदी करणारा व्यक्तीही खोटा असतो! म्हणजे तुम्ही समोरच्याला खरा मालक समजून व्यवहार करता, पण नंतर लक्षात येतं की सगळी तयारी फसवणुकीसाठीच होती. म्हणूनच प्रत्येक कागदपत्र नीट तपासा, सातबारा, फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड यांची खात्री स्वतः करा आणि शक्य असल्यास गावातील लोकांमार्फत माहिती काढा.
एकच जमीन दोन-तीन लोकांना विकण्याचा डाव
फसवणुकीचा हा प्रकार सर्वात जास्त घातक आहे. एकाच जमिनीची दोन किंवा तीन वेळा विक्री केली जाते. सुरुवातीला खरेदीखत नोंदवून घेतलं जातं आणि त्यानंतर सातबाऱ्यावर नाव बदलण्यासाठी काही महिने लागतात. याच काळात खरा मालक किंवा दलाल पुन्हा एकदा तीच जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकतो. तुम्ही तुमचं खरेदीखत घेऊन समाधानाने बसलेले असता, आणि काही दिवसांनी कळतं की ती जमीन दुसऱ्यालाही विकली गेली आहे! त्यामुळे जमीन घेतल्यानंतर लगेचच तलाठ्याकडे सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज करा आणि मालकाकडून अधिकार पत्र (possession letter) देखील मिळवा.
बँकेकडून गहाण असलेल्या जमिनीची विक्री
कधी कधी जमीन मालकाने त्या जमिनीवर आधीच कर्ज घेतलेलं असतं, पण त्याची नोंद सातबाऱ्यावर झालेली नसते. अशावेळी तुम्ही ती जमीन खरेदी करता, आणि नंतर जेव्हा सातबारा सही साठी विचारला जातो, तेव्हा बँकेकडून जमीन जप्त केली आहे हे लक्षात येतं. ही फार मोठी फसवणूक आहे. त्यामुळे जमीन खरेदीपूर्वी त्या गावातील विश्वासू व्यक्तींकडून मालकाची माहिती घ्या. शक्य असल्यास जवळच्या बँकेमध्ये चौकशी करा की त्या व्यक्तीने जमीन गहाण ठेवली आहे का. ही छोटीशी काळजी तुम्हाला लाखो रुपयांच्या फसवणुकीपासून वाचवू शकते.
वारसांची ना-हरकत
जर मालक मृत असेल आणि त्याच्या नावावर जमीन असेल, तर सातबाऱ्यावर त्याच्या वारसांची नोंद केलेली असते. परंतु जर नोंद नसेल आणि तुम्ही जमीन खरेदी केली, तर नंतर त्याचे वारस कोर्टात दावा करतात. त्यानंतर तुमचं सर्व स्वप्न भंगतं आणि वर्षानुवर्षं कोर्ट, वकील, तारखा यामध्ये अडकावं लागतं. त्यामुळे अशा वेळी सातबाऱ्याची सखोल तपासणी करा, आणि सर्व वारसांकडून ‘ना हरकत पत्र’ (NOC) घेणं आवश्यक आहे. ही सावधगिरी तुम्हाला भविष्यातील त्रासापासून वाचवेल.
फसवणूक झालीच तर काय कराल?
जर तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल, तर घाबरू नका. तुम्ही तुमच्या कागदपत्रांसह तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता. त्यांच्या मार्फत त्या प्रकरणाची तपासणी होईल. याशिवाय आर्थिक फसवणूक झाली असल्यास पोलिसात तक्रार दाखल करा. पोलीस त्या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करतात. पण एक लक्षात ठेवा, ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आहे, त्यामुळे फसवणूक होण्यापूर्वीच सावधगिरी घेणं उत्तम आहे.