Old Vehicles Selling: जुनी गाडी घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RTO चा मोठा निर्णय, आता नाही होणार फसवणुक…

Old Vehicles Selling: जुनी गाडी खरेदी करताय? मग थांबा… कारण एक महत्त्वाचा बदल आता तुमचं भविष्य सुरक्षित करू शकतो. हो, कारण आरटीओने एक असा निर्णय घेतलाय, जो जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत क्रांती घडवणार आहे. तुम्ही जुनी गाडी घेताना फसवणुकीच्या गोष्टी ऐकल्याच असतील, एखाद्याला गाडी मिळाली, पण नाव बदललं नाही, काही महिन्यांनी ट्राफिक चलान, अपघाताच्या नोटिसा घरी पोहोचल्या. आता मात्र या अशा टेन्शनची गरजच उरणार नाही आहे. कारण पुणे आरटीओने एक असं पाऊल उचललंय, ज्यामुळे हजारो लोकांचा जीव भांड्यात पडणार आहे.

सध्या नवीन वाहनांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की सामान्य कुटुंबासाठी गाडी घेणं म्हणजे स्वप्न झालंय. त्यामुळे अनेकजण जुन्या वाहनांकडे वळले आहेत. मात्र हीच गरज फसवणुकीसाठी चोरट्यांना संधी देत होती. गाडी खरेदी केली, पण नावावर झालीच नाही, आधीच्या मालकाकडून मिळालेली NOC घेतली, पण नोंद झालीच नाही. अशा अनेक केसेस समोर येत होत्या. पण आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने याला पूर्णविराम देण्याचा निर्धार केलाय.

पुण्यात दरवर्षी हजारो जुन्या गाड्या विकल्या-विकत घेतल्या जातात. लाखो रुपयांची उलाढाल होते. छोट्या मोठ्या गल्ल्यांपासून मोठ्या डिलर पर्यंत सगळीकडे जुनी वाहनं खरेदी-विक्री केली जातात. मात्र खरी अडचण तेव्हा होते, जेव्हा गाडी घेतल्यानंतरही तिची तुमच्या नावावर नोंद होत नाही. आणि त्यानंतर सुरू होतो फसवणुकीचा खेळ. हेच लक्षात घेता आता पुणे आरटीओने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय, म्हणजे आता जुन्या वाहन विक्रेत्यांना मिळणार आहे अधिकृत परवाना.

आरटीओने घेतलेल्या या निर्णयामुळे जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री अधिक सुरक्षित होणार आहे. ज्यांना कोणाला जुनी गाडी विकायची आहे, त्यांना आता आरटीओकडून परवाना घ्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही गाडी विकत घेताना किंवा विकताना खात्रीपूर्वक व्यवहार करू शकता. यामुळे ग्राहक आणि विक्रेते या दोघांनाही याचा फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खोट्या कागदपत्रांवर होणाऱ्या व्यवहारांना यामुळे आळा बसणार आहे.

कशी केली जाते फसवणूक?

जुन्या गाड्यांच्या व्यवहारात फसवणूक कशी होते, हे सांगायचं झालं तर, अनेक वेळा गाडी विकणाऱ्यांनी ती एखाद्या विक्री सेंटरला दिलेली असते, आणि तिथून ती दुसऱ्यालाच विकली जाते. पण नावात बदल केला जात नाही. पूर्वीचा मालक अजूनही कागदोपत्री मालक राहतो आणि नवा वापरकर्ता कुठल्याच कायदेशीर यादीत नसतो. कधी कधी तर NOC मिळालेलं असतं पण नावांतर केलेलंच नसतं. यामुळे पेनल्टी, चलान, गुन्हेगारी स्वरूपाचे विषयही आधीच्या मालकाच्या नावावर येतात. आणि हे सगळं टाळण्यासाठीच RTO आता पुढे आलं आहे.

परवाना मिळवण्यासाठी करावा लागणार अर्ज

पुणे आरटीओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाहन विक्री करणाऱ्यांना आता “अधिकृत विक्रेता” म्हणून नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना RTO कार्यालयात 29A नुसार अर्ज करावा लागेल. हा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना 29B प्रमाणपत्र दिलं जाईल. यामुळे त्या डीलरला गाडी खरेदी करून त्याच्या स्वत:च्या सेंटरच्या नावावर नोंद करता येईल आणि पुढे ती गाडी विकताना कोणताही गोंधळ राहणार नाही.

स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं की, ग्राहकांची फसवणूक थांबवणं, त्यांना सुरक्षित व्यवहाराचा अनुभव देणं हेच यामागचं प्रमुख कारण आहे. त्यांच्या मते, हे परवाने मिळाल्यानंतर जुन्या वाहनांची खरेदी-विक्री अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध होईल.

ही योजना केवळ पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर लवकरच इतर शहरांमध्येही लागू केली जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता जर तुम्ही जुनी गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर फक्त गाडीच्या किंमतीवर नाही, तर त्या विक्रेत्याकडे RTOचा अधिकृत परवाना आहे का, हे देखील तपासा. कारण आता काळ बदलतोय आणि ग्राहकांची सुरक्षा ही आरटीओची जबाबदारी बनली आहे. आता नवीन नाही, तर “जुनी गाडी” घेतानाही काही काळजीचं कारण नसणार आहे!