Land Records Department: भूमिअभिलेख कार्यालयात काम असलं की अनेकदा वेळेचा आणि संयमाचा कस लागतो. कागदपत्रांसाठीच्या फेऱ्या, रांगेत तासन्तास उभं राहणं आणि वेळेवर काम होईल की नाही याची चिंता… हे सगळं तुम्ही सुद्धा अनुभवलेल असेलच ना? पण आता काळजी करण्याची गरज नाही! सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे, ज्यामुळे हे सगळं सहज आणि सोपं होणार आहे. आता कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांत फिरायची गरज नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे.
महसूल विभागाने ‘प्रत्यय’ ही डिजिटल प्रणाली सुरू केली आहे, जी भूमिअभिलेख कार्यालयातील अपील प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन करणार आहे. या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, विभागीय उपसंचालक आणि अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे थेट ऑनलाइन अपील दाखल करता येणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, लोकांना परस्पर माहिती मिळेल आणि त्यांचा बराच वेळ वाचेल. सरकारी कार्यालयांमध्ये लागणाऱ्या फेऱ्या आणि तिथे होणाऱ्या विलंबामुळे नागरिकांची होणारी गैरसोय देखील आता या सोयीमुळे संपुष्टात येणार आहे.
‘प्रत्यय’ प्रणालीमुळे नागरिकांना काय फायदे मिळणार?
ही प्रणाली सुरू झाल्यामुळे अर्जदारांना अपील प्रक्रियेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. यामध्ये अर्जाची सद्यस्थिती, नोटीस, सुनावणीची तारीख आणि निकालासंदर्भातील अपडेट्स त्वरित मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयात जाऊन चौकशी करण्याची गरजच पडणार नाही. आधीच्या प्रक्रियेमध्ये अनेक कागदपत्रं, वकील आणि सततच्या चकरांमुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाया जायचे, पण आता डिजिटल प्रक्रियेमुळे ही सगळी झंझट कमी होणार आहे.
या प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये
ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असल्यामुळे फेरफार, तक्रारी, अपील आणि पुनर्विलोकन हे सगळं घरबसल्या करता येणार आहे. अर्जदारांना अर्जाची सद्यस्थिती, सुनावणीच्या तारखा आणि संबंधित पक्षांचे म्हणणे सुद्धा या प्रणालीमुळे ऑनलाइनच बघता येणार असून, भविष्यात, अर्जदार आणि अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट सुनावणीत भाग सुद्धा घेऊ शकणार आहेत. यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. तसेच यामुळे पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नागरिकांचा सरकारी कामांवरील विश्वास सुद्धा वाढणार आहे.
महसूल विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक मोठं पाऊल
‘प्रत्यय’ प्रणालीचे उद्घाटन मुंबई येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि उपसंचालक राजेंद्र गोळे देखील उपस्थित होते. महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, संपूर्ण महसूल विभागाचे कामकाज पेपरलेस करण्याच्या दिशेने हा एक मोठा निर्णय आहे. या नवीन प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि अर्जदारांना झटपट न्याय मिळू शकेल.
प्रलंबित प्रकरणांना मिळणार गती
सध्या महसूल विभागात ११,००० हून अधिक अपील प्रलंबित असल्याचं समजून येत आहे, आणि त्यापैकी काही अपील हि २०१२ पासून रखडलेली आहेत. या नव्या प्रणालीमुळे ही प्रकरणे लवकर निकाली निघतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या डिजिटल प्रक्रियेमुळे अपीलदारांना जलद निकाल मिळेल आणि सरकारी कार्यालयांमधील अनावश्यक विलंब टाळता येईल.
‘प्रत्यय’ प्रणालीमुळे महसूल विभागाचे कामकाज केवळ कागदपत्रांपुरते मर्यादित राहणार नाही. भविष्यात संपूर्ण सुनावणी प्रक्रिया डिजिटल करण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे केवळ अपीलच नव्हे, तर इतर अनेक महसूल प्रकरणेही ऑनलाइन पद्धतीने निकाली काढता येणार आहेत.